SSC Exam News : उद्यापासून सुरू होणार इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा….

उद्यापासून इयत्ता दहावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. इयत्ता बारावीची परीक्षा अगोदरच सुरु झाली आहे. शुक्रवारपासून 10 वीची परीक्षा सुरू होत आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या लेखी परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत आहे. या परीक्षेसाठी राज्यातील सरकारी, अनुदानित आणि खासगी व्यवस्थापनाच्या २३ हजारांहून अधिक शाळांनी जय्यत तयारी केली आहे. राज्यात दहावीचे १६ लाख विद्यार्थी ही परीक्षा देतील.

राज्यात एकूण १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी इयत्ता दहावीच्या परीक्षा देतील . यामध्ये मुंबई विभागातून तीन लाख ६० हजार ३१७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर पुणे विभागातून दोन लाख ७५ हजार ४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर सर्वात कमी कोकण विभागात २७ हजार विद्यार्थी संख्या आहे. उद्यापासून होणाऱ्या या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर जय्यत तयारी सुरू आहे. आसनव्यवस्था, कॉपीमुक्त परीक्षा, सीसीटीव्ही या सर्वांचीच चोख व्यवस्था करण्यात येत आहे. 

आज अकरा वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पत्रकार परिषद घेऊन याविषयीची सविस्तर माहिती देणार आहे. इयत्ता 12 वीच्या धर्तीवर, इयत्ता 10 वीच्या परीक्षेतही राज्यातील अनेक जिल्ह्यातील संवेदनशील केंद्रावर कॅमेऱ्याची नजर असेल. कॉपीमुक्त परीक्षेचा संकल्प अधिक दृढरित्या राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तर भरारी पथक आणि बैठ्या पथकांना पण बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

काही परीक्षा केंद्र ही कॉपीसाठी गाजली होती, अशा केंद्रावर बोर्डाचीच नाही तर सीसीटीव्हीची नजर असेल. तर केंद्रावरील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी काही ठिकाणी कर्मचारी बदलण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत याविषयीची माहिती देण्यात येऊ शकते.