WTC Final च्या पहिल्याच दिवशी सचिनचा महाविक्रम मोडीत

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2024-25 च्या अंतिम सामन्याला क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर बुधवारपासून सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिदेदरम्यान खेळवल्या जात असलेल्या या सामन्याच्या पहिल्याच दिवशी विक्रमांचा पाऊस पडला आहे. ‘क्रिकेटचा देव’ अशी ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरचा एक महाविक्रम अशा खेळाडूने मोडला आहे जो ऑस्ट्रेलियाच्या मदतीसाठी कायमच धावून येतो. हा खेळाडू करो या मरोच्या सामन्यांचा बादशाह होण्यास सज्ज झाला आहे. ज्या खेळाडूबद्दल आपण बोलतोय त्याचं नाव आहे स्टीव्ह स्मिथ! स्मिथने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2024-25 च्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी दमदार खेळी करत सचिनचा एक महाविक्रम स्वत:च्या नावावर केला आहे.

दक्षिण आफ्रिकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची सुरुवात अडखळतच झाली. मात्र नंतर स्टीव्ह स्मिथ फलंदाजीसाठी मैदानात उथरला तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या घातक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाच्या डावाची अधिक पडझड होणार नाही याची काळजी त्याने घेतली. त्याने दमदार अर्थशतक झळावलं. स्टीव्ह स्मिथने 112 चेंडूंमध्ये 66 धावांची खेळी केली. या अर्धशतकासहीत स्मिथ नॉकआऊट सामन्यांमध्ये सर्वाधिक अर्थशतकं झळकावणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

आयसीसीच्या नॉकाऊट सामन्यांमध्ये सर्वाधिक अर्धशतकं झळकावणाऱ्यांमध्ये सचिनचं नाव आहे. त्याने 14 डावांमध्ये 6 अर्धशतकं झळकावली आहेत. मात्र आता स्टीव्ह स्मिथने त्याचा विक्रम मोडीत काढला आहे. स्मिथने 13 डावांमध्ये 7 अर्धशतकं झळकावली आहेत. पहिल्या क्रमांकावर विराट कोहली असून त्याने आयसीसीच्या नॉकआऊट सामन्यांमध्ये 24 डावांमध्ये 10 अर्धशतकं झळकावली आहेत. आता स्मिथने नॉकआऊट सामन्यांमध्ये अजून चार अर्धशतकं झळकावली तर तो विराटही मागे टाकेल. विराट कसोटी आणि टी-20 मधून निवृत्त झाल्याने स्मिथकडे त्याला मागे टाकण्याची संधी आहे. चार अर्धशतकं झळकावल्यास या विक्रमाचा विराटच्या डोक्यावरील मुकूट स्मिथचा होईल हे निश्चित!

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावामध्ये 212 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेड, कॅमरन ग्रीन, उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेनसारख्या खेळाडूंना पहिल्या डावात नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. वेबस्टरने केलेल्या 72 धावा आणि स्मिथने केलेल्या 66 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 212 पर्यंत मजल मारता आली. दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने पाच विकेट्स घेतल्या. मार्को यान्सनने 3 विकेट्स घेतल्या. गोलंदाजी करतानाही ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली आहे. स्टार्कने सुरुवातीलाच 2, कमिन्सने 1 आणि हेजलवुडने एका दक्षिण आफ्रिकन फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला आहे. पहिल्या दिवसाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेची स्थिती 43 धावांवर चार गडी बाद अशी आहे. ते अजूनही ऑस्ट्रेलियापेक्षा 169 धावा पिछाडीवर आहेत.