सांगोला तालुक्यातील ३२०३ लाभार्थीना प्राप्त होणार घरकुल मंजुरी पत्र व पहिला हप्ता वितरण पत्र

शासनाकडून अनेक नवनवीन योजना राबविल्या जातात. जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा पुरेपूर लाभ होईल. या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न देखील केले जातात. सांगोला तालुक्यातील ३२०३ लाभार्थीना एका क्लिकवर घरकुल मंजुरी व पहिला हप्ता वितरण पत्र प्राप्त होणार आहे अशी माहिती बीडीओ उमेशचंद्र कुलकर्णी यांनी दिली. प्रधानमंत्री आवास योजना घरकुल ग्रामीण टप्पा २ अंतर्गत दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ या एकाच दिवशी एका क्लिकवर सांगोला तालुक्यातील ३२०३ लाभार्थीना घरकुल मंजुरी पत्र व पहिला हप्ता वितरित करणार असल्याचे उमेशचंद्र कुलकर्णी गटविकास अधिकारी पंचायत समिती सांगोला यांनी सांगितले.

यापुढे माहिती देताना गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी म्हणाले की सदरचा राज्यस्तरावरील मुख्य कार्यक्रम शिवछत्रपती क्रीडा संकुलन बालेवाडी पुणे येथे होणार असून राज्यातील २० लाख घरकुलांची मंजूर पत्रे व १० लाख लाभार्थीना पहिला हप्ता वितरण पुणे येथे माननीय नामदार अमित शहा केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार यांचे हस्ते होणार आहे. सदर कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले ग्रामीण गृहनिर्माण विभागाचे संचालक डॉ राजाराम दिघे इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम होणार आहे. 

सांगोला तालुक्यातील कार्यक्रम बचत भवन सांगोला येथे दुपारी २:०० वाजता होणार असून प्रतिनिधीक स्वरूपात १० ग्रामपंचायत बामणी, वाढेगाव, चिंचोली, एखतपूर, कमलापूर, अकोला, वासूद, कडलास, शिवणे व सावे मधील प्रत्येकी ३० लाभार्थीना याप्रमाणे तालुक्यातील प्रतिनिधिक स्वरूपात ३०० लाभार्थी व ग्रामपंचायत स्तरावर उर्वरित सर्वच लाभार्थीना मंजुरी पत्र व अनुदान देण्यात येणार आहे. तालुकास्तरीय कार्यक्रमासाठी १० ग्रामपंचायती मधून ३०० लाभार्थी यांना सहकुटुंब व सहपरिवार आमंत्रित करण्यात आलेले आहे.

सदरचा कार्यक्रम माननीय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख तसेच माजी, आमदार माननीय शहाजी बापू पाटील व माननीय माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील व चेतन सिंह केदार जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या उपस्थितीत होणार असून यावेळी इतर मान्यवर व आजी-माजी पदाधिकारी तसेच सर्व विभाग प्रमुख यांनाही निमंत्रित करण्यात आलेले आहे.

उर्वरित लाभार्थीना ग्रामपंचायत स्तरावर मंजुरी पत्र व पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे तरी ज्या लाभार्थीना शासनाकडून घरकुल मंजूर झालेले आहे त्यांनी घरकुल उत्सवासाठी जास्त संख्येने घरकुल उत्सव कार्यक्रमास उपस्थित राहावे संबंधित ग्रामपंचायत मधील आजी-माजी पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून घरकुल उत्सवात सहभागी व्हावे असे गटविकास अधिकारी यांनी यावेळी आवाहन केले आहे.