गुरुवारी ‘हा’ माजी आमदार उपमुख्यमंत्री शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीत करणार शिवसेनेत प्रवेश!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे निकटवर्तीय असलेले हातकणंगलेचे माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ. सुजित मिणचेकर (Dr. Sujit Minchekar) हे गुरुवारी (ता.२७) शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला.

शिवसेनेचे (Shiv Sena) एकनाथ शिंदे हे बंड करत तब्बल ४० आमदार घेऊन गुवाहाटीला गेले. त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले शिवसेनेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर हेदेखील शिंदेसेनेत जातील, असा विश्वास अनेकांना होता.मात्र, मिणचेकर यांनी अडचणीच्या काळी उद्धव ठाकरे यांची साथ न सोडण्याचा निर्णय घेतला व विधानसभा निवडणुकीपर्यंत शिवसेना ठाकरे गटातच राहिले.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभेत निवडणुकीवेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली. मात्र, त्यांना अपयश आले.दरम्यान, निवडणुकीवेळी शिवसेना ठाकरे गटाला रामराम केलेले डॉ. मिणचेकर आता खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ‘