जागेचे पावित्र्य राखण्यासाठी इचलकरंजीतील कॉ.के. एल. मलाबादे चौक बंदीस्त

इचलकरंजी शहरात सध्या अनेक विकासकामे सुरु आहेत. तसेच नागरिकांच्या अनेक समस्या प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरु झालेले आहेत. छत्रपती धर्मवीर श्री संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी मंजूर झालेल्या के.एल. मलाबादे चौकाचे पावित्र्य राखावे यासाठी सदर चौकाभोवती पत्रे लावून चौक बंदिस्त करणेत आला आहे. दरम्यान छ. श्री संभाजी महाराजांच्या स्मारकासंदर्भात अंतिम आराखडा तयार झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल, असे प्रसिध्दीपत्रक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज प्रतिष्ठानच्यावतीने प्रसिध्दीस दिले आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून इचलकरंजी शहरवासिय, शिवभक्त व शंभुभक्त यांच्या मागणीवरून हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा के.एल. मलाबादे चौकात उभारण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी व आयुक्त यांनी आवश्यक सर्व परवानगीचे पूर्तता करून मंजूरी दिली आहे. त्यामुळे कॉ. के. एल. मलाबादे चौकाचे पावित्र्य कायम रहावे यासाठी सदरच्या चौकाला पत्रे लावून बंदीस्त करण्यात आले आहे. दरम्यान, येत्या चार दिवसात खासदार, आमदार, आयुक्त व संभाजी महाराज स्मारक समिती यांची संयुक्त बैठक होणार असून अंतिम आराखडा तयार होईल व प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल, असे पत्रक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज प्रतिष्ठानच्यावतीने प्रसिध्दीस दिले आहे.