वाढत्या उन्हामुळे शाळा सकाळी घेण्याची मागणी….

सध्या उन्हाचा चटका वाढला आहे. तापमान 39 अंश सेल्सियस इतके होऊ लागले आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई, कडक उन्हाळा याचा विपरित परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोलापूर जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. त्यामुळे सोलापूर शहर-जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरविणे गरजेचे आहे.

वाढत्या उन्हापासून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी प्राथमिकच्या शिक्षणाधिकार्‍यांनी हा निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांना दिल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश महासचिव सुनील चव्हाण यांनी दिली. शाळा सकाळच्या सत्रात घ्याव्यात. अशी मागणी केल्यानंतर शिक्षणाधिकारी शेख यांनी या मागणीवर शिक्षण समितीच्या बैठकीत विषय मंजूर करुन हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन संघटनेला दिले आहे.