इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात मोठ्या टी 20 लीगपैकी एक असून याचा 18 वा सीजन 22 मार्च पासून सुरु होणार आहे. भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी (MS Dhoni) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2020 मध्ये निवृत्ती घेतली असली तरी अजूनही तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळताना दिसतो. त्याचे फॅन्स धोनीला मैदानात खेळताना पाहण्यासाठी उत्सुक असतात आणि सीएसकेचे (Chennai Superkings) सामने ज्या मैदानावर होतील तेथे मोठ्या संख्येने गर्दी करतात. मागील काही वर्षांपासून आयपीएलमधून धोनी निवृत्ती घेणार अशा चर्चा सुरु आहेत.
मात्र दरवर्षी धोनी ‘डेफिनेटली नॉट’ असं म्हणून पुढील वर्षी पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज होतो. मात्र यंदा 43 वर्षांच्या धोनीने स्वतः टी शर्टवर लिहिलेल्या कोर्डवर्डद्वारे आयपीएल 2025 हा सीजन त्याचा शेवटचा ठरणार असे संकेत दिले आहेत. चेन्नई सुपरकिंग्सचा माजी कर्णधार एम एस धोनी याने आयपीएल 2025 पूर्वी पुन्हा एकदा आपल्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत. धोनी बुधवारी चेन्नई एअरपोर्टवर लँड झाला.
तेव्हा त्याने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता. त्या टी-शर्टवर मॉस कोडमध्ये ‘वन लास्ट टाइम’ असं लिहिलं होतं. ज्यामुळे आयपीएल 2025 साठी हे सीजन धोनीचं शेवटचं सीजन असणार अशी चर्चा पुन्हा एकदा सुरु झालीये. चेन्नई सुपरकिंग्सचा प्री सीजन ट्रेनिंग कॅम्प गुरुवारी सुरु झाला. ज्यामध्ये धोनी सह भारतीय खेळाडूंचा सहभाग राहिला होता. धोनीच्या टीशर्टवर असलेल्या मोठ्या चिन्हांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.
जेव्हा हा कोड डिकोड करण्यात आला तेव्हा समजले की याचा अर्थ ‘वन लास्ट टाइम’ असा होतो. सीएसकेच्या चाहत्यांनी यावर विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. त्यामुळे बघता बघता हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. धोनीने आयपीएल वगळता आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतलेली आहे.
धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्सने आतापर्यंत 5 ट्रॉफी जिंकल्या आहेत. आयपीएल 2024 पूर्वी धोनीने सीएसकेचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवले होते. त्याच्या नेतृत्वात संघाने मागच्या सीजनला चांगला परफॉर्मन्स दिला मात्र ते प्लेऑफमध्ये क्वालिफाय करू शकले नाहीत.