शेतकऱ्याकडून 30 हजारांची लाच घेताना महसूलचे 3 कर्मचारी जाळ्यात

मंडणगाव तालुक्यातील शेनाळे येथे लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाने धाड टाकून मंडल अधिकारी, ग्रामसेवकासह एका महसूल कर्मचाऱ्याला रंगेहात अटक केली आहे. या महसूल कर्मचार्‍यांना शेतकऱ्याकडून तब्बल 30 हजार रुपयांची लाच (Bribe) घेताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आल्याने तालुका महसूल प्रशासन विभागात खळबळ उडाली आहे. 27 मे रोजी सांयकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास मंडणगड तहसील कार्यालय आवारात ही कारवाही करण्यात आली. लिलावामध्ये खरेदी केलेल्या शेतजमिनीचा फेरफार नोंद करुन तसा सातबारा उतारा देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी, मंडळ अधिकारी अमित शिगवण, म्हाप्रळ ग्राम महसूल अधिकारी (अतिरिक्त कारभार सोवेली सजा) श्रीनिवास श्रीरामे व मंडणगड उपकोषागार कार्यालय येथील शिपाई मारुती भोसले यांना अटक करण्यात आली आहे.

मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याकडून संबंधित सातबारा उतारा करून देतो असे सांगून या कामासाठी मारुती भोसले या शिपायाने तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. विशेष म्हणजे भोसले यांनी तक्रारदाराकडून 45 हजार रुपये ऑनलाईन स्वरुपात स्वीकारले आहेत. मात्र, तरीही फेरफार नोंद मंडळ अधिकारी यांनी पूर्ण रक्कम न मिळाल्याने रद्द केली. त्यानंतर, तक्रारदाराने 27 मे रोजी मंडळ अधिकारी अमित शिगवण, श्रीनिवास श्रीरामे व मारुती भोसले यांच्यासमक्ष भेट घेतली. तेव्हा हा फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी मंडळ अधिकारी अमित शिगवण याने तक्रारदाराकडे पुन्हा 30 हजार रुपयांची लाच मागितली. त्यावेळी, ही रक्कम देताना एसीबीने कारवाई करत रंगेहात अटक केली.

मंडळ अधिकारी शिगवण याने तक्रारदार यांच्याकडून 30 हजार रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारली. स्वीकारलेल्या लाच रकमेतील स्वतःचा हिस्सा 15,500 स्वतःसाठी ठेवून उर्वरित 14,500 रुपयांचा हिस्सा तलाठी श्रीनिवास श्रीरामे याला दिला. त्यामुळे, महसूल विभागाने कारवाई करत तिघांनाही अटक केली आहे.