मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनयाचे सम्राट आणि विनोदाचे बादशाह म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पाच दशकांहून अधिक काळ मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या भूमिका करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे अशोक सराफ यांनी आपल्या यशाचं श्रेय त्यांचे मामा आणि कुटुंबाला दिलं आहे. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतच्या आठवणींनाही उजाळा दिला.
पद्मश्री मिळणं तुमच्यासाठी नेमकं काय आहे? असं विचारलं असता ते म्हणाले, “माझा एकंदर आतापर्यंतचा जो प्रवास आहे, करिअरसाठी जे समर्पित केलं होतं त्यावर झालेलं हे शिक्कामोर्तब आहे. याचा मला फार आनंद झाला आहे. लोकांनी त्याचं कौतुक करावं ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे”.
पुढे ते म्हणाले, “हे सगळं माझ्या गुरुमुळेच झालं आहे. माझे गुरु माझे मामा आहेत. जे नाटक आणि सिनेमा इंडस्ट्रीत निर्माते आणि दिग्दर्शक होते. त्यांच्याकडून जे काही शिकलो ते मी माझ्या पद्धतीने लोकांपुढे सादर केलं. मला त्यांच्याकडून बाळकडू मिळालं, त्याबद्दल त्यांना श्रेय देईन . तसंच माझ्या कुटुंबाला देईन ज्यांनी मला समजून घेतलं. किती उपलब्ध असेन, घरी नसेन हे माहिती असतानाही सगळ्या कुटुंबाने अॅडजस्ट करुन घेतलं याचं कौतुक करतो”.
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा देत ते म्हणाले की, “आम्ही मराठीत 50 चित्रपट केले आहेत. त्यातील अर्ध्याहून जास्त हिट आहेत. आमची जोडी जमली होती. जे माझं टायमिंग होतं, तेच त्याचं होतं. दोघांचं टायमिंग एकत्र जुळायचं त्यामुळे लोकांना पाहायला आवडायचं. मराठी सिनेमाचा पडता काळ असताना आम्ही लोकांना चित्रपटगृहापर्यंत येण्यास भाग पाडलं”.
तुम्ही चित्रपटसृष्टीत इतकं योगदान दिलं असताना हा पुरस्कार मिळण्यासाठी उशीर झाला का? असं विचारलं असता ते म्हणाले की, “उशीर झाला असं वाटत नाही. पुरस्कार दिला हे महत्त्वाचं आहे. मला विसरले तर नाहीत ना? विसरले असते तर तसं म्हणालो असतो. अशी कोणती गोष्ट नाही. पुरस्कार दिला हे महत्त्वाचं आहे. त्यांनी माझा विचार केला किंवा त्यांनी आधीच ठरवलं होतं हे मला माहिती नाही. पण दिला हे माझ्यासाठी मोठी बाब आहे”.
पुढे ते म्हणाले की, “आता जबाबदारी वाढली आहे आणि तसं झालंही पाहिजे. आता थांबू शकत नाही. पुढचाही विचार करावा लागेल. पद्म पुरस्काराचं एक महत्त्व असून, ते मानायला हवं. या पुरस्काराची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे. मला या पुरस्कारासाठी पात्र समजलेल्या सरकारचा मी आभारी आहे”.
