खानापूर तालुक्यातील 11 आणि आटपाडी तालुक्यातील 7 गावे पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर

दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईची शक्यता गृहीत धरून प्रशासनाच्यावतीने टंचाई आराखडा तयार केला जातो. त्यानुसार यंदाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. गेल्यावर्षी एप्रिल-मे 2024 मध्ये सुमारे 100 हून अधिक टँकरने जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि तासगाव या तालुक्यांत टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून असा दोन टप्प्यांचा हा आराखडा आहे. त्यामध्ये खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील गावे टंचाईच्या उंबरठ्यावर असल्याचा अंदाज आहे, त्यांना टंचाई काळात टँकरने तसेच विहिरी अधिग्रहीत करून पाणीपुरवठा करण्यासाठी हा आराखडा तयार करण्यात आला आहे.

गेल्यावर्षी जून महिन्यापर्यंत टंचाईची तीव्रता वाढली होती. मात्र त्यानंतरच्या पावसाळ्यात वरुणराजाने चांगलीच कृपा केली. त्यामुळे गतवर्षी जिल्ह्यात सर्वच तालुक्यात चांगल्या पावसाची नोंद झाली. सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. खानापूरमध्ये 140 टक्के आणि आटपाडी तालुक्यात 175 टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. तरीही पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची  शक्यता आहे. त्यामुळे, प्रत्येकी एका गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल, असा अंदाज आहे.