आटपाडी येथील सुरु असणारे उपोषण पाचव्या दिवशी तात्पुरते स्थगित

आटपाडी मध्ये मागील पाच दिवसापासुन सुरु असणारे टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामात गोलमाल व संबंधित अधिकारी यांच्या निलंबना बाबत सुरु असणारे उपोषण अखेर पाचव्या दिवशी माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्या मध्यस्थीने तात्पुरते स्थगित करण्यात आले. पाच दिवसापासून अमरण उपोषण चालू होते यामध्ये उपोषणकर्त्यांच्या तब्येती खालावत चालली होती. त्यामुळे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्या मध्यस्तीने हा निर्णय घेऊन उपोषण थोडे दिवस मागे घेण्यात आले. याप्रसंगी माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर, आटपाडी तहसीलदार मनोजकुमार एतवडे, आटपाडी पोलीस निरीक्षक विनय बहिर, यु. टी जाधव सर, विष्णू अर्जुन, जयवंत सरगर, प्रणव गुरव, दादासाहेब हुबाले, जगन्नाथ पडळकर,अमोल सावंत आदी मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.

उपोषणास बसलेले शेखर रणदिवे, नवनाथ रणदिवे, बळीराम रणदिवे, अशोक पवार, आणि राहुल बुधावले यांना ब्रम्हानंद पडळकर, आटपाडी तहसीलदार, आटपाडी पोलीस निरीक्षक यांचे हस्ते लिबू सरबत देऊन उपोषण सोडवण्यात आले व उपोषण स्थगित करीत असल्याचे पत्र तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना उपोषणकर्ते यांचे कडून देण्यात आले. यावेळी उपोषणकर्त्यांनी उपअभियंता शिवाजी पाटील आणि यांचे सहकारी यांच्यावर टेम्भू योजनेच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. यामध्ये त्यांचे निलंबन करण्याची ठाम मागणी करीत, यामध्ये या भ्रष्टाचारात सहभागी असणारे हणमंत गुणाले यांची खातेनिहाय चौकशी करुन योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

पुढे उपोषणकर्ते म्हणाले की, उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले असले तरी मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र छेडण्याचा इशारा देण्यात आला आणि याबाबत प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्यात. मागण्या मान्य न झाल्यास पुढील तीव्र आंदोलनास प्रशासन जबाबदार असेल असे उपोषणकर्ते यांनी सांगितले.