लेंगरे गावचे सुपुत्र कृषिभूषण स्व. दादासाहेब बजरंग ठिगळे यांच्या स्मरणार्थ प्रा. संजय दादासाहेब ठिगळे व परिवाराने निसर्ग फाउंडेशन संस्थेस ५१ हजारांचा मदतनिधी दिला. प्रा. संजय ठिगळे हे प्राध्यापक पदावर ३४ वर्षाची प्रदीर्घ सेवा करीत आज निवृत्त झाले. प्राध्यापक पदाची सेवापूर्ती होत असताना प्रा. संजय ठिगळे यांनी आरोग्यसेवेतील रुग्णवाहिका या उपक्रमासाठी जाहीर केलेली ५१ हजार रुपये ही देणगी सांगली येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील आयोजित कार्यक्रमात देणगीचा ‘धनादेश भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉ. एम. एस. सगरे, प्राचार्य डॉ. एस. व्ही पोरे यांच्या हस्ते सांगली जिल्हा शल्य चिकित्सक, निसर्ग फाउंडेशनचे कार्यवाह डॉ. विक्रमसिंह कदम, फाउंडेशनचे सहकार्यवाह फिरोज शेख, सचिव नानासाहेब मंडलिक, अध्यक्ष नितीन चंदनशिवे, प्रकल्प संचालक प्रमोद भोसले यांच्याकडे प्रदान केला.
प्रा. संजय ठिगळे यांच्या सेवनिवृत्ती आयोजित केलेल्या शुभेच्छा सोहळ्यात आपल्या हातून सामाजिक कर्तव्य व समाजाप्रति आपले दातृत्व या हेतूने खानापूर तालुक्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निसर्ग फाउंडेशन संस्थेला ५१ हजार रुपयेची देणगी दिली. आणि सामाजिक बांधिलकी जोपासली. यावेळी बोलताना प्रा. संजय ठिगळे म्हणाले की, माझे वडील स्व. दादासाहेब ठिगळे आण्णा यांनी गावाकडचा जपलेला ओलावा मी स्मरणात ठेऊन सातत्याने गावाची ओढ माझ्या मनात असते. निसर्ग फाउंडेशन ही संस्था खूप चांगले काम करत आहे. लोकांच्या हितासाठी काम करत असलेल्या या संस्थेचा मी सल्लागार म्हणून काम करत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.