ऐन मार्गशीर्ष महिन्यात मांसाहार वर्ज्य असला तरी हॉटेल आणि खानावळीवर प्रचंड प्रमाणात चिकन आणि मटणाला उठाव आहे. त्यातच थंडीचा कडाका वाढल्याने चिकन, मटण आणि अंडी यांना मागणी वाढली आहे.परिणामी बाजारभावात काही प्रमाणात वाढ झाल्याने पोल्ट्री व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. आंबेगाव तालुक्यात 103 गावांमध्ये जवळपास चिकनचे 500 व्यावसायिक आहेत.
अंड्याचे दर शेकडा 640 रुपये पर्यंत गेले आहेत. ब्रॉयलर कोंबडीचे घाऊक दर 100 गाठल्याने चिकनच्या दरातही प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने ब्रॉयलर कोंबडीच्या घाऊक दरात मोठी वाढ केल्यामुळे 180 रुपये किलो दराने चिकन मिळत आहे, अशी माहिती कळंब येथील ख्वाजा गरीब नवाज चिकन अँड एग्ज सेंटरचे विक्रेते इसाक शेख आणि घोडेगाव येथील भारत चिकन व होलसेल बॉयलर कोंबडीचे व्यापारी जावेद मिस्त्री आणि फिरोज मिस्त्री यांनी दिली आहे.
याउलट अंडी उत्पादन करणारे बहुतांशी पोल्ट्री फार्म खाद्याच्या आणि अंड्याचा बाजारभाव गडगडत असल्याने हे फार्म कायमचे बंद केल्याची माहिती कळंबचे उद्योजक तुषार कानडे यांनी दिली आहे.अंड्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने ग्राहकांना 7 रुपयाला 1 अंडे मिळत आहे.
घाऊक व्यापारी अंड्याची खरेदी शेकडा 640 रुपयाप्रमाणे करत आहेत, अशी माहिती चांडोली बुद्रुक येथील अंडी उत्पादक पोल्ट्री फार्मच्या उद्योजिका माया शंकर थोरात, उद्योजक गोविंद थोरात निकेतन दैने, नितीन बारवे, अकबर मीर यांनी दिली आहे.गावोगाव चिकन आणि मटन व्यवसायात मोठी स्पर्धा निर्माण झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
बकर्याच्या मटणाचे दर हे नेहमी स्थिर असून हे थोड्याफार प्रमाणात वाढत असतात. मार्गशीष महिना चालू असूनही हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची वर्दळ पाहायला मिळत आहे.