धक्कादायक! गडचिरोलीतील आश्रम शाळेतील शंभरहून अधिक विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा!

गडचिरोलीतून धक्कादाक वृत्त हाती आलं आहे. गडचिरोलीतील शासकीय मुलींच्या आश्रम शाळेतील शंभरहून अधिक विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.गडचिरोलीतील शासकीय आश्रमशाळेत हा प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील सोडे येथील शासकीय मुलींच्या आश्रम शाळेतील शंभरहून अधिक विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. आश्रमातील जवळपास ७३ विद्यार्थिनींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आश्रम शाळेच्या विद्यार्थिनींनी दुपारच्या सुमारास कोबी, भाजी, वरण, भात असे जेवण केलं. त्यानंतर काही विद्यार्थिनींना उलट्या आणि हगवणचा त्रास सुरू झाला.

ही बाब शिक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी विद्यार्थिनींना धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने ७३ विद्यार्थिनींना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असली तरी या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.