सांगोला व मोहोळ येथून पंढरपुरात बेकायदेशीररित्या विक्रीसाठी आणलेले सुमारे ३३ हजार २८० रूपये किंमतीचे २०८ किलो गोवंश मांस शहर पोलिसांनी धुलिवंदन दिवशी जप्त केले याप्रकरणी दोघांविरूद्ध महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम १९७६ च्या कलमान्वये गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडू दत्तात्रय वायदंडे व सोहेल अस्लम कुरेशी अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहे. धुलवड दिवशी मोठ्या प्रमाणावर मांस विक्री होत असते. हे ओळखून यातील खंडू वायदंडे याने सांगोला येथून, तर सोहेल कुरेशी याने मोहोळ येथून विना परवाना गोवंश मांस विक्रीसाठी आणले होते.
शहरातील अण्णाभाऊ साठेनगर येथे दोन वेगवेगळ्या पत्राशेडमध्ये बेकायदेशीररित्या हे मांस विक्री केले जात असल्याची गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, सहा. फौज़दार शरद कदम, हवालदार सिरमा गोडसे, गरड, हेंबाडे, लेंडवे, समाधान माने यांच्या पथकाला त्या ठिकाणी पाठविले. पोलीस पथकाने वायदंडे व कुरेशी या दोघांना ताब्यात घेऊन गोवंश मांस विक्रीविषयी चौकशी केली असता त्यांनी कबुली दिली. १६० रूपये किलो दराने हे मांस विक्री करीत असल्याचे समोर आले. याबाबतची फिर्याद पोलीस कॉ. समाधान माने यांनी दाखल केली आहे. पुढील तपास हवालदार पवार हे करीत आहेत..