डोंबिवलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील खासगी रुग्णालयालाही चोरट्यांचा फटका बसला असून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेल्या महिला रुग्णाचे मंगळसूत्र लंपास केल्याचा भयानक प्रकार घडला आहे. रुग्णालयात शिरून चोरट्यांनी उपचार घेत असलेल्या महिलेच्या उशीखालून 36 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र पळवलं. ही घटना उघडकीस येताच प्रचंड खळबळ माजली असून कायदा-सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न रुग्णाचे नातेवाईक आणि इतर नागरिकांनीही उपस्थित केला आहे. दरम्यान या चोरी प्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांकडून चोरट्यांचा तपास सुरू आहे.
रुग्णही सुरक्षित नाही, हॉस्पिटलमधून महिलेचे मंगळसूत्र चोरलं
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेतील कोपर गावातील स्वरा गॅलेक्सी सोसायटीत राहणाऱ्या अमोल वाघमारे (36) यांनी या चोरीबाबत रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांची पत्नी अलका वाघमारे (वय 28) या उपचारांसाठी डोंबिवली पूर्वेतील फडके रोडवरील एका खासगी रुग्णालयात भरती आहेत. झोपताना मंगळसूत्र टोचत असल्याने रविवारी सकाळी सहाच्या सुमारास अलका यांनी ते काढलं आणि उशीखाली ठेवलं होतं. मात्र थोड्या वेलाने त्या उठल्या. साधारण 9 च्या सुमारास त्यांनी मंगळसूत्र पुन्हा घालण्यासाठी उशीखाली हात घातला पण ते सापडलं नाही. म्हणून त्यांनी सगळीकडे शोधाशोध सुरू केली.
अलका यांनी बिछाना व खाटेखाली शोध घेतला, रुग्णालयात सर्वत्र मंगळसूत्र शोधलं पण ते काही सापडल नाहीच. त्यामुळे अज्ञात चोरट्याने उशीखालून मंगळसूत्र लंपास केल्याचा संशय आहे. घटनेची माहिती मिळताच अमोल वाघमारे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. रामनगर पोलिसांनी रुग्णालय आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, उपनिरीक्षक गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. यामुळे संतापाचे वातावरण असून आता सामान्य नागिरक, रुग्ण हे हॉस्पिटलमध्येही सुरक्षित नाहीत का असा संतप्त सवाल विचारला जात आहे.