टोप भूमी अभिलेख कार्यालयास कायमस्वरूपी अधिकारांची नागरिकांकडून मागणी ; अन्यथा आंदोलनाचा इशारा

हातकणंगले तालुक्यातील टोप येथील भूमी अभिलेख कार्यालय असून अडचण नसून खोळंबा ठरत आहे. अधिकारी कुठे आहेत हे कर्मचाऱ्यांना माहिती नसते. त्यामुळे या कार्यालयाचा कारभार रामभरोसे चालू असल्याने याचा फटका शिरोली, नागाव, टोप, संभापूर, कासारवाडी, अंबप, मनपाडळे, अंबपवाडी या गावातील सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. यातून नागरिकांनी सामूहिक आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. हातकणंगले तालुक्यातील टोप गावात भूमी अभिलेख कार्यालय १९५४ पासून म्हणजे गेली ७० वर्षापासुन कार्यान्वित आहे. येथे शिरोली, नागाव, टोप, संभापूर, कासारवाडी, अंबप, मनपाडळे, अंबपवाडी सह इतर गावातील जमीन मोजणीशी संबंधित महत्वाचे असलेले हे कार्यालय आहे. येथील शेतकरी व सर्वसामान्य जनतेची कामे या कार्यालयावर अवलंबून असतात.

जमिन मोजणी, प्रॉपर्टी कार्ड, बँक बोजा, बँक प्रकरण, वारस नोंद, खरेदी नोंद यासह विविध कागदपत्रे दररोज नागरिकांना आवश्यक असतात. त्यामुळे या कार्यालयात विविध प्रकारचे दाखले व नकलांसाठी नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. हि कामानिमित्त आलेल्या नागरिकांची वर्दळ कमी करण्यासाठी येथे अधिकारी, कर्मचारी जागेवर असणे गरजेचे आहे पण असे न होता नागरिकांना आपली कामे पुर्ण करून घेण्यासाठी चकरा मारून मारून पायातील चप्पला झिजवाव्या लागतात तरी त्यांची कामे अधिकारी कर्मचाऱ्यांविना पुर्ण होत नसल्याने आमचे गाऱ्हाणे कोणाकडे मांडायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.