हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे किरकोळ कारणावरून जोरदार हाणामारी झाली . यामध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला झाला असून यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. प्रमोद विश्वास वडर असे त्याचे नाव आहे. या घटनेची नोंद हुपरी पोलिस ठाण्यात झाली असून तीन आरोपींना अटक केली आहे. तर प्रथमेश उर्फ मोन्या विजय पांढरे व २५ रा. वाळवेकर नगर हुपरी हा फरार झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घडली एकमेकांचे मित्र असणारे एकमेकांचे वैरी होऊन आरोपींनी संगनमत करून जखमी वडर यास वाळवेकर नगर येथे बोलावून घेतले व आज तुला जीवंत सोडणार नाही म्हणून मारहाण करायला सुरुवात केली.
प्रथमेश जाधव याने बॅगेत लपवून ठेवलेला कोयता प्रथमेशकडे देत त्याला ठार मारण्यासाठी आवाज दिला. यावेळी सपासप डोक्यावर हातांवर वार केला असून या जीवघेण्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. जीवीताच्या आकांताने आरडा ओरड कानावर पडताच नागरिकांनी घडलेल्या या गंभीर प्रकाराची पोलिसांना कल्पना दिली असता तात्काळ घटनास्थळावर पोलिस दाखल होताच आरोपींनी पळ काढला. पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमीला तात्काळ अपघात सेवेच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सीपीआर कोल्हापूर येथे पाठविण्यात आले.
तेथे प्रमोद वडर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रथमेश उर्फ मोन्या विजय पांढरे, प्रथमेश मारुती जाधव, शुभम मारुती कांबळे व शाहबाज शाहनवाज पटेल यांच्या विरोधात हपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील तीन आरोपींना रात्री उशिरा अटक केली असून पीएसआय अशोक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.