अलीकडे अतिक्रमण हे प्रत्येक भागात पहायला मिळतच आहे. अनेकवेळा या अतिक्रमणामुळे वाहतुकीस देखील अडथळा निर्माण होतो. या अतिक्रमणाविरोधात अनेक वेळा आंदोलने देखील केली जातात. सध्या रेंदाळ येथील श्री बिरदेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर खूपच अतिक्रमण वाढलेले असल्याचे पहायला मिळत आहे. ग्रामदैवत बिरदेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील झालेले अतिक्रमण काढावे या मागणीसाठी ता.२४ रोजी कृष्णात पुजारी यांनी रेंदाळ ग्रामपंचायत कार्यालया समोर शुक्रवार सकाळपासून एक दिवसीय लक्षणिक उपोषणाला सुरवात केली. गट नं. १६६३ मधील ले आऊट प्लॅन नुसार सर्व रस्ते, ओपन जागा ग्रामपंचायतकडे वर्ग करून स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे. त्यानंतर भागातील सर्व प्रकारचे अतिक्रमण निष्काशित करणेकामी सबंधित विभागास पाठपुरावा करून ग्रामपंचायतकडून तात्काळ अतिक्रमण काढून घेतले जाईल.
अतितातडीने रहदारीस रस्ता खुला करणे, अतिक्रमण काढून घेत असल्याचे सरपंच सुप्रिया पाटील, ग्रामविकास अधिकारी एकनाथ सूर्यवंशी यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी आमदार डॉ. अशोकराव माने यांच्या सुचनेनुसार वरिष्ठ कार्यालय अप्पर तहसिलदार सुनील शेरखाने यांच्याबरोबर तात्काळ मिटिंग लावणेबाबतची लेखी हमी ग्रामपंचायतने दिली.