इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील सह. साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष प्रतीक पाटील यांचा आंतरराष्ट्रीयस्तरावर झालेला सन्मान आपणा सर्वांना अभिमानास्पद असल्याची भावना कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी व्यक्त केली. प्रतीक पाटील यांचे कारखाना कार्यस्थळावर जंगी स्वागत करून अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. प्रतीक पाटील सत्कारास उत्तर देताना म्हणाले, हा केवळ माझा एकट्याचा सन्मान नसून हा आपल्या सर्व टीमचा सन्मान आहे. आपल्या सभासद शेतकऱ्यांचा कामगारांचा, हितचितकांचा सन्मान आहे.
राजारामबापू समूह हा आपला एक परिवार असून आ. जयंतराव पाटील हे आपले कुटुंब प्रमुख आहेत. भविष्यातही स्व. बापूंच्या विचाराने शेती व सहकार क्षेत्रात भरीव काम करू. बाळासाहेब पवार म्हणाले, प्रतीक पाटील यांनी केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात प्रथम शेतात औषध फवारणीसाठी ड्रोनचा वापर केला आहे. त्यांनी ठिबक सिंचन योजना, सच्छिद्र निचरा प्रणाली योजना अतिशय प्रभावीपणे राबविल्या आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतातील एकरी उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा चांगला वापर केलेला आहे. विठ्ठल पाटील म्हणाले, प्रतीक पाटील शेतकऱ्यांसाठी नवनव्या योजना राबवित आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गात नवा उत्साह संचारला आहे.