इचलकरंजी कृष्णा नळ योजनेचे काम पूर्ववत सुरु; आ. आवाडे यांचे शिरढोणकरांना आश्वासन

 इचलकरंजी महानगरपालिकेने नव्याने कृष्णा जलवाहीनीचे काम शिरढोण येथे सुरू केले आहे. मात्र योजनेचे काम करताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियम धाब्यावर बसवून तसेच कामात अनेक त्रुटी असल्याने सामाजिक कार्यकर्ते नागेश कोळी, प्रविण दानोळे यांनी बांधकाम विभागाकडे तक्रार केल्याने दोन दिवसांपूर्वी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम बंद पाडले होते. रविवारी आमदार राहूल आवाडे, इचलकरंजी महानगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी बाजीराव कांबळे, जयसिंगपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी बी. एच. चाचुर्डे हे शिरढोण येथील कामाच्या ठिकाणी आले.

आमदार आवाडे यांनी तक्रादार व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या तक्रारी ऐकून घेतले. यावेळी ग्रामस्थांनी महापालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी व ठेकेदार यांच्या विरोधात तक्रारीचा पाढा वाचत या योजनेमुळे योजनेलगत असलेल्या घरांना भविष्यात गळतीचा धोका निर्माण होऊ नये, योजनेला गळती लागल्यास तातडीने दुरुस्त करण्यात यावे, शेतीपीकांचे, घरांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळावी, खुदाई करताना रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी केली. या मागण्या मान्य करत आमदार आवाडे यांनी लेखी आश्वासन ग्रामपंचायतीला दिल्यानंतर जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ववत सुरू झाले.