इचलकरंजी शहर हे उद्योगनगरी म्हणून परिचित आहे. शहर परिसरात कामगार वर्गाची संख्या मोठी आहे. बहुसंख्य कामगार जुगार, मटकामध्ये गुरफटल्याचे चित्र आहे. शहर परिसरात अनेक ठिकाणी सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली सर्रासपणे जुगार खेळताना दिसून येतात. काही वेळेला या जुगार अड्ड्यांवर कारवाई केली जाते. मात्र, पुन्हा, येरे माझ्या मागल्या… प्रमाणे त्याच ठिकाणी पत्त्याची पाने पिसली जातात. याकडे पोलिसांचे सोपस्कारपणे दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे. मटक्याचे हे पेव दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येत आहे. काही वेळेला पोलिसी खाक्या दाखवून कारवाई केली जाते. मात्र, सध्या मटक्यामध्येही आधुनिकता आल्याचे बोलले जात आहे.
इचलकरंजी जुगार, मटक्याबरोबर आता आयपीएल सुरू होताच वस्त्रनगरी इचलकरंजी शहर परिसरात सट्टाबाजार उन्हाप्रमाणे तापू लागला आहे. गेले काही वर्षांमध्ये सट्टाबाजारमध्ये शहरातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. तर सट्टा घेणारे अनेकजण गब्बर बनले आहेत. पोलिसांकडून म्हणावी तशी कारवाई होत नसल्याने सट्टाबाजारचे जाळे दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
इचलकरंजीसह आसपासच्या ग्रामीण भागातूनही तसेच सीमाभागातीलही मंडळी सट्टा बाजारमध्ये आपला खेळ मांडत आहेत. त्यामुळे इचलकरंजी शहर हे सट्टा बाजाराचे मोठे केंद्र बनत चालल्याचे विदारक चित्र दिसत आहे. तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या सट्टेबाजाराची पाळेमुळे खोदून काढून काढण्याची गरज निर्माण झाली आहे. तेव्हा पोलीस खात्याने तातडीने कारवाई करावी अशी मागणी सट्टाबाजारमध्ये उतरले असून आपल्या शहरवासीयांतून होत आहे
.