खो-खो पंढरी वस्त्रनगरी इचलकरंजीत सोमवारी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,उपसंचालक क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभाग कोल्हापूर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर, कोल्हापूर खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शासनाच्या कै.भाई नेरुरकर चषक खो-खो स्पर्धेला सोमवारी दिमाखात शुभारंभ करण्यात आला. स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धेचे स्वागताध्यक्ष, माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि स्पर्धा समिती उपाध्यक्ष आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण व मैदानाचे पुजन करुन करण्यात आले.
माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी, वस्त्रनगरीबरोबरच इचलकरंजीचा क्रीडानगरी म्हणून नांवलौकिक आहे. या शहराला मोठी क्रीडा परंपरा असून स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली आहे. सर्वाधिक संख्येने एखाद्या शहरातील खेळाडू शासकीय सेवेत विविध पदावर कार्यरत असणारे इचलकरंजी हे एकमेव शहर असल्याचे सांगितले. आमदार राहुल आवाडे यांनी, जो खेळाडू कर्तृत्व दाखवेल तोच यशस्वी ठरेल. त्यामुळे हार-जीत न मानता खिलाडूवृत्तीने खेळाचे प्रदर्शन करा. वस्त्रनगरीने सदैव खेळालाही प्राधान्य दिले असून भविष्यातही खेळासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.
तत्पूर्वी स्पर्धेत सहभागी सर्वच खेळाडूंची शहरातील मुख्य मार्गावरुन जल्लोषी स्वागत रॅली काढण्यात आली. महात्मा गांधी पुतळा येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली. वाद्यांच्या गजरात भगवे फेटे परिधान करुन सहभागी झाली होते. कॉ. मलाबादे चौक,श्री शिवतीर्थ ते छत्रपती राजर्षि शाहू पुतळा ते क्रीडांगण अशी रॅली काढण्यात आली. रॅली मैदानात आल्यानंतर सर्वच संघांनी पाहुण्यांचा मानवंदना दिली.
