कुंभोज येथील मिलिंद भोसले यांनी सायकलवरून केला तब्बल १३६०० किमी प्रवास; ९ राज्यातील हिंदू मंदिरांना भेटी

हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील मिलिंद भोसले हे अतिशय सामान्य कुटुंबातील असून ते गवंडी काम करतात. घरची परिस्थिती हालाखीची असून सुद्धा मिलिंद यांना सायकलच्या माध्यमातून प्रवास करणे, विविध राज्यांना, विविध हिंदू मंदिरांना भेटी देणे या गोष्टीचा छंद आहे. ते मागील पाच वर्षापासून भारतामध्ये विविध ठिकाणी सायकलने प्रवास करून हिंदू मंदिरांना भेटी देत आहेत. या वर्षी मिलिंद भोसले यांनी एकूण १३६०० किलोमीटरचा प्रवास एका सामान्य रेंजर सायकलच्या मदतीने पूर्ण केला आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. तसेच प्रामुख्याने राम मंदिर अयोध्या, बागेश्वर बालाजी धाम, वैष्णोदेवी मंदिर, महाकाल मंदिर, तुळजाभवानी मंदिर, मोठा मारुती मंदिर, अंबाबाई मंदिर, दत्त मंदिर, शनिशिंगणापूर मंदिर, गोल्डन टेम्पल, राधाकृष्ण मंदिर, कोपेश्वर मंदिर अश्या ९ राज्य व २४ हिंदू मंदिरांना भेटी दिल्या. 

हा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्यांना एकूण ६८ दिवसांचा प्रवास केला आहे. कुंभोज येथून सुरू झालेला प्रवास पुन्हा कुंभोज या ठिकाणी मुख्य बस स्थानक चौकात पूर्ण झाला. गावातील प्रमुख मार्गावरून फेरी काढून मिलिंद भोसले यांचे स्वागत करण्यात आले. गावातील विविध हिंदू संघटनांच्यावतीने मिलिंद यांचा सत्कार करण्यात आला. मिलिंद भोसले हे हिंदू जनजागृतीचे काम करत असून त्यांचे अत्यंत उल्लेखनीय आहे. यापुढे त्यांना लागेल ती मदत करू असे आश्वासन कुंभोज येथील विविध हिंदू संघटना व गावातील प्रमुख मान्यवरांच्यावतीने करण्यात आले.