रेंदाळच्या पिता-पुत्रावर गुन्हा; सेलमच्या व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

फेब्रुवारी महिन्यात सदर व्यापारी रेंदाळ येथील आरोपींच्या घरी येऊन ६७ टंचाची १११ किलो ९७८ ग्रॅम वजनाच्या पायल पैंजणाची ऑर्डर घेतली होती. त्याप्रमाणे मार्च २०२३ मध्ये आरोपींच्या घरी तयार माल पोहोच केला. बदल्यात हिशेबाने येणारी ७३ किलो ८०१ ग्रॅम चांदीची मागणी केली असता १५ दिवसांत देतो म्हणून सांगितले. पूर्वीच्या व्यवहारात चांगला असल्याने विश्वास ठेवून परत गेलो. परंतू काही दिवसांनी चांदीबाबत विचारल्याने दिलीप पाटील यांने तुला चांदी नाही दिली तर काय करणार, हुपरीत पाय ठेवू देणार नाही, धंदा करुन दाखव, तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याचे सचिन प्रल्हाद चव्हाण यांनी हुपरी पोलिसात फिर्याद नोंदवली.

त्यानुसार आरोपी धनंजय पाटील व दिलीप पाटील या पिता-पुत्रावर हुपरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहा किलो चांदीची फसवणूक झालेला अद्याप सेलमचा मोहिते नामक व्यापारी तक्रार दाखल करण्यासाठी आला नसून जिल्हा पोलिस प्रशासनाला हा गुन्हा दाखल होण्याची प्रतीक्षा आहे. यातील आरोपी धनंजय पाटील हा बनावट पाटला फसवणूक प्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात अटकेत आहे.