आळते येथील इंडो काऊंट कंपनीतील कामगारांचे आंदोलन

हातकणंगले तालुक्यातील आळते येथील पूर्वाश्रमीच्या प्रणवादित्य स्पिनींग मिल व सध्याच्या इंडो काऊंट इंडस्ट्रीज या खाजगी सुतगिरीणीतील कामगार व व्यवस्थापन यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. कामगारांनी आपला हक्क मागितला तर कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांवर दडपशाही केली जात असा त्यांचा आरोप आहे. कंपनी व्यवस्थापन स्थानिक कामगारांवर अन्याय करत असल्याची भावना स्थानिक कामगारांची झाली आहे. त्यातच कंपनी व्यवस्थापनाने स्थानिक चार कामगारांची इतर युनिटमध्ये बदली केली आहे.

हातकणंगले तहसिलदार सुशिलकुमार बेल्हेकर यांच्या उपस्थितीत तहसिलदार कार्यालयात बैठक संपन्न झाली होती. कंपनी प्रशासनाकडून सोमवापर्यंत निर्णय घेण्याचे सांगण्यात आले होते मात्र कुठलाच निर्णय न झाल्याने कामगारांनी कंपनीच्या प्रवेशदारा समोरच बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. साखळी उपोषणास दलित महासंघाचे मार्तंड वाघमारे, रिपब्लिकन विद्यार्थी सेना यांनी पाठींबा जाहिर केला. साखळी उपोषणात पं.स.माजी उपसभापती प्रविन जनगोंडा, जावेद मुजावर, शिरीष थोरात, सागर खोत, दिपक शिंदे, संदीप बाचणकर, शशिकांत घाटगे यांच्यासह महिला व पुरुष कामगार सहभागी झाले होते.