गेल्या महिन्याभरापासून हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोलीत डेंग्यूची साथ वाढत आहे. १५ मार्च ते आजतागायत अचानक डेंग्यूचे रुग्ण वाढले. त्या काळात शासकीय नियमांचे पालन करीत शासकीय रुग्णालयात लॅब केलेल्या रुग्णांची संख्या कमी आहे.
पट्टणकोडोली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट असलेल्या अलाटवाडी या उपनगरामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले होते. पट्टणकोडोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने घरोघरी सर्व्हे करुन माहिती घेण्यात आली. आता ही साथ आटोक्यात आली आहे, अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुर औंधकर यांनी दिली.
चार दिवसापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने सर्व्हे करीत असताना ५ रुग्ण आढळून आले आहेत. ते रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. ते एन. एस. १ असल्याने खात्रीलायक डेंग्यू झाला असे म्हणता येत नाही असेही डॉ. औंधकर यांनी सांगितले. डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने जोरदारपणे सर्व्हे सुरु असून नागरिकांना रिकाम्या जागेत, भांड्यात, कुंड्या, टायर, पाण्याची टॉकी, रांजण, भंगार वस्तू, डबे यामध्ये पाणी साठत असेल तर त्यामध्ये डेंग्यूच्या आळ्या होऊन डासांचे प्रमाण वाढते.
तरी पाण्याचा साठा कमी करण्याची दक्षता घ्यावी. स्वच्छता राखावी, निरोपयोगी वस्तूंची विल्हेवाट लावावी. पाण्याचे साठे आठवड्यातून एकदा रिकामे करावेत. ताप आल्यास त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार करुन घ्यावेत असे आवाहनही डॉ. मयुर औंधकर यांनी केले आहे.