उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या इचलकरंजी दौऱ्यामुळे जीएसटी परताव्याची वाढली आशा

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाई नेरूळकर खो-खो स्पर्धेच्या बक्षीस समारंभ निमित्त इचलकरंजी दौऱ्यावर गुरुवारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये महापालिका अधिकारी व इतर प्रशासकीय अधिकान्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे इचलकरंजी महानगरपालिका अलर्ट झाली असून या दौऱ्यानिमित्त घेण्यात येणाऱ्या बैठकीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारा ११०० कोटी रुपयांचा जीएसटीचा परतावा मिळवण्यासाठी या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच घनकचरा प्रकल्पाचा प्रश्नही मार्गी लागण्याची शक्यता दाट शक्यता वर्तवली जात आहे.

या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिका इमारतीचे रंगरंगोटीचे काम सुरू आहे, त्यामुळे महापालिका इमारतीला नवीन झळाळी येणार आहे. महापालिका इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर सदर इमारतीची रंगरंगोटी झाली नसल्यामुळे इमारतीला भकास स्वरूप प्राप्त झाले होते. इमारतीच्या रंगरंगोटी बरोबरच प्रशासकीय विभाग उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये मांडाव्याच्या प्रश्नाबाबत अलर्ट झाले आहे. इचलकरंजी महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सध्या कमकुवत झाल्याने अनेक देणी भागवणे महापालिकेला कठीण झाले आहे. तसेच अनेक विकास कामे ही प्रलंबित असल्याने सदर बैठकीवेळी शहराच्या विकासासाठी भरघोस निधीची मागणी महापालिका अधिकारी व शहरातील लोकप्रतिनिधी करण्याची शक्यता असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा इचलकरंजी शहरासाठी फायद्याचा ठरतो की तोट्याचा याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.