हॉटेलमधील मेनू कार्ड पाहिल्याच्या कारणावरून पिस्तुलाचा धाक दाखवत बेदम मारहाण केली. तसेच गाव सोडून जा, नाही तर पत्नीवर बलात्कार करायला लावीन, अशी धमकी दिल्याप्रकरणी हेर्ले येथील चौघांविरोधात सोमवारी हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना कोल्हापूर-सांगली मार्गावर माले गावच्या हद्दीत असलेल्या बाबा हॉटेलमध्ये दुपारी तीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी फिर्याद अभिषेक छत्री भोघाटी (वय २४, मूळ नेपाळ, सध्या रा. आंबेडकरनगर, हेर्ले) यांनी दिली. टिपूसुलतान खतीब, मोहम्मद कुरेशी, प्रवीण नथ्था पाटील, मनोज संजय कांदे (चौघेही रा. हेले; ता हातकणंगले) यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अभिषेक भोघाटी हा हॉटेल बाबा जवळील पानटपरीमध्ये थांबला होता. त्याला मनोज कांदे याने मारहाणीच्या हेतूने हॉटेलमध्ये बोलावून मेन्यू कार्ड दाखवले. त्यावेळी मोहमद कुरेशी व कांदे यांनी अभिषेक भोघाटी व त्यांच्यासोबत असलेला कामगार जितुकुमार याला हॉटेलचे मेन्यू कार्ड का बघितलास, असे दरडावत काठी व लोखंडी रॉडने पाठीवर, पायावर, मारहाण केली. यात भोघाटी व जितुकुमार दोघेही जखमी केले. यावेळी बाबा हॉटेलमालक टिपू सुलतान खतीब याने भोघाटी यांच्या डोक्याला पिस्तूल लावून दारू पाजली आणि त्याला समोर बसवून पिस्तूल रोखत व्हिडीओ काढला. तसेच तू आणि तुझी पत्नी उद्याच येथून निघून जा, नाहीतर तुझ्या पत्नीवर बलात्कार करायला लावीन अशी धमकी दिली.