आमदार आवाडेंच्या वक्तव्याचा निषेध!

तारदाळ येथील दहा एकर गायरान जागा डीकेटीई संस्थेने ४० वर्षांपूर्वी क्रीडांगणासाठी म्हणून भाडेतत्त्वावर घेतली आहे. या क्रीडांगणाच्या जागेला बंदिस्त कुंपण कामाचे उद्घाटन कार्यक्रमावेळी आमदार आवाडेंनी केलेल्या त्या वक्तव्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने गाव बंद ठेवत पाठिंबा दर्शविला. तारदाळ (ता. हातकणंगले) येथे डीकेटीई संस्थेने भाडेतत्त्वावर घेतलेल्या गायरान जागेला बंदिस्त कुंपण कामाचे उद्घाटन करण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे आले असता, ग्रामस्थांनी विरोध केला. यावेळी आवाडे यांनी ग्रामस्थांना अरेरावी करत गुन्हे दाखल करण्याची भाषा केली. त्याच्या निषेधार्थ सोमवारी तारदाळ गाव बंद ठेवून आमदारांचा जाहीर निषेध करीत रॅली काढण्यात आली.

तसेच या गायरान जमिनीमध्ये बेकायदेशीर अतिक्रमण डीकेटीईविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. यावेळी प्रसाद खोबरे, प्रमोद परीट, विनोद कोराणे, विकास गायकवाड, रणजित पोवार, सुनील शिंदे आदींनी मनोगत व्यक्त करत आमदारांचा हेकेखोरपणा व गावाविरुद्ध गेल्याबद्दल धडा शिकवू असे सांगितले. दरम्यान, पोलिस प्रशासनाने बेकायदेशीर सुरू असलेल्या कामाला बंदोबस्त दिल्याने ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त होत होती.