हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथे जंदीसो-ब्रॉनसो ऊरूसास मोठ्या उत्साहात प्रारंभ

हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथील ग्रामदैवत जंदीसो-ब्रॉनसो उरुसास काल गुरुरवारी सुरवात झाली. उरुसाचा पारंपरिक पद्धतीने, धार्मिक वातावरणात, मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. भाविक भक्तांनी बुधवारी रात्री ८ ते ११ या वेळेत तुरबतीवर पाण्याचा अभिषेक घातला. त्यानंतर रात्री बारा वाजून एक मिनिटांनी चंदन, अष्टगंध, घेवला, कचोरा,अबीर व सुवासिक अत्तर घातलेल्या गंधाचा लेप तुरबतीवर लावला. त्यानंतर गलेफ घालून दुवा व फातिहाचा कार्यक्रम झाल्यानंतर मुख्य उरुसास सुरुवात झाली. त्यानंतर शेजारील दावल मलिक यांच्या तुरुबतीस गंधलेप केला. 

उरूसानिमित्त दर्ग्यामध्ये भरपूर रंगरंगोटी, आकर्षक सजावट व डोळे दिपून टाकणारी विद्युत रोषणाई केली आहे. ते पाहून डोळ्यांचे पारणे फिटत आहे. भाविक भक्तांनी पाणी घालणे, दंडवत घालणे, गलेफ घालणे आदीसाठी गर्दी केली. महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविक भक्तांनी दर्शनासाठी रांग लावली. बुधवारी रात्री कव्वाल वसीम शाबरी, दिल्ली विरुद्ध कव्वाल शमा कौसर पुणे यांचा कवालीचा मुकाबला झाला.