महाराष्ट्र शासनाने इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रशासकपदाचा कार्यभार आयुक्त पल्लवी पल्लवी पाटील यांच्याकडे सोपवला आहे. याआधी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. या संदर्भातील आदेश नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी बुधवारी जारी केला. इचलकरंजी महानगरपालिका स्थापन झाल्यावर महानगरपालिकेचे पहिले आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पदभार स्विकारला त्यांनी नियोजनबध्द कामातून प्रशासनाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अवघ्या दीड वर्षातच देशमुख यांनी आपली अन्यत्र बदली करुन घेतली. त्यानंतर आयुक्त पदावर नियुक्ती मिळालेले ओमप्रकाश दिवटे यांचीही दीड वर्षाची कारकिर्दही वादातच सरली.
मध्यंतरी दिवटे यांच्या जागी अचानकपणे पल्लवी पाटील यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. परंतु दिवटे यांनी मॅटमध्ये जात या नियुक्तीला स्थगिती आणल्याने आयुक्तपदी दिवटे कायम राहिले. मात्र, त्यानंतर अवघ्या काही दिवसातच राज्य शासनाने त्यांच्याकडे असलेला प्रशासक पदाचा पदभार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. दीड महिन्यापूर्वी आयुक्त दिवटे यांची बदली झाली आणि आयुक्तपदी पल्लवी पाटील या रुजू झाल्या. परंतु प्रशासक पदाचा पदभार हा जिल्हाधिकारी येडगे यांच्याकडेच होता. त्यामुळे हा पदभार पुनश्च आयुक्तांकडे येणार का? असा सवाल सातत्याने उपस्थित होत होता. त्याला बुधवारी पूर्णविराम मिळाला आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे असलेला प्रशासक पदाचा भार हा आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.