पट्टणकोडोली येथे छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळा संदर्भात तोडगा; मुरलीधर जाधव यांनी घेतली उपमुख्यमंत्रांची भेट

हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवाजी चौकामध्ये छ. शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला. यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याने बुधवारी पोलीस प्रशासन हा पुतळा हटविण्यासाठी मोठा फौजफाटा घेऊन गावात दाखल झाले. परंतू याला शिवभक्तांनी कडाडून विरोध दर्शविल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने गावात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे गावाला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले. त्या दरम्यान, शिव पुतळा संदर्भात तोडगा काढण्यासाठी मुरलीधर जाधव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूस्थानचे आराध्य दैवत असून रितसर परवानग्या भविष्यात घेण्यात येतील. तोपर्यंत स्थापित मूर्तीला प्रशासनाने हात लावू नये अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या अशी माहिती युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव यांनी सांगितली. यावेळी प्रांताधिकारी मोसमी चौगुले, अप्पर तहसीलदार सुनिल शेरखाने, इचलकरंजी पोलीस उपअधीक्षक समिरसिंह साळवी, हुपरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक एन. आर. चौखंडे, मंडल अधिकारी प्रदीप शिंदे, तलाठी रविशंकर राजगिरवाड, प्रभारी सरपंच अमोल बाणदार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, शिवभक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.