पट्टणकोडोलीची राष्ट्रीय पेयजल पाणीपुरवठा योजना तब्बल अकरा वर्षानंतर पूर्ण

हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोलीला गेली ११ वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या राष्ट्रीय पेयजल योजनेतून अखेर पाणी पुरवठा  सुरु झाला. खासदार धैर्यशील माने आणि आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते जलपूजन करून या राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणीपुरवठा सुरु करण्यात आला. यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी मी जिल्हापरिषद सदस्य होतो तेव्हा ही पेयजल योजना ग्रामपंचायतीचा एक रुपयाही न भरता १००% योजनेच्याच पैशातून मंजूर करून आणली होती मात्र गेली १०-१२ वर्षे काहीना काही अडचणीमुळे या योजनेतुन पाणी पुरवठा सुरु करता आला नाही.

यावेळी आमदार अशोकराव माने यांनी गावच्या विकासासाठी जेवढा निधी देता येईल तितका निधी देण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. प्रास्ताविक करताना सचिनकुमार शिंदे यांनी पट्टणकोडोलीसाठी तत्कालीन खासदार कै. बाळासाहेब माने, माजी खासदार निवेदिता माने आणि आता खासदार धैर्यशील माने यांच्या कुटुंबियांचा पट्टणकोडोलीच्या विकासासाठी नेहमी प्रयत्न राहीला असल्याचे नमुद करून १९७२ पासून पाचगाव पाणीपुरवठापासून आताच्या राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामाचा आणि आणखीन तीन कोटींहून अधिकचा निधी नवीन पेयजल योजनेसाठी मंजूर असल्याचे सांगितले.

पाणी पंप, फिल्टर हाऊस आणि जलकुंभाची खासदार माने आणि आमदार माने यांनी पाहणी केली ग्रामपंचायत आणि ग्रामस्थाकडून खासदार माने यांचा नागरी सत्कार करण्यात आला.