तारदाळ-शहापूर रोडवरील सुर्यलक्ष्मी बायो एनर्जी या कंपनीत अनेकवेळा अवजड वाहनांची वाहतूक होत असते. मंगळवारी रात्री या अॅग्रोकडे येणाऱ्या ट्रकमधून नियमापेक्षा जास्त उंचीने कच्चा माल भरून आला असता मुख्य रस्त्यावर असणाऱ्या विद्युत तारेचा स्पर्श ट्रकला झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे परिसरातील काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होते. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत संबंधित सुर्यलक्ष्मी बायो एनर्जी कंपनीला स्थानिक नागरिकांनी सुचना दिल्या होत्या.
बुधवारी सकाळी १० वा. च्या सुमारास सुर्यलक्ष्मी बायो एनर्जी या कंपनी जवळ कच्चा माल उतरण्यासाठी ट्रक आला असता सामाजिक कार्यकर्ते अमित खोत, संजय टेके व स्थानिक नागरिकांनी ट्रक रोखून धरला व प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना जागेवर बोलावून घेतले. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय शिर्के यांनी तीन ट्रकवर प्रत्येकी २० हजार ५०० रूपयांची दंडात्मक कारवाई केली. या कारवाईमुळे तारदाळ-शहापूर मुख्य रस्त्यांवर अवैध माल वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांना इथून पुढे चाप बसणार काय अशी चर्चा उपस्थित नागरीकांत होत होती.