सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील तरुणाचा उत्तर प्रदेश येथे मृत्यू

सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील सिद्धनाथ सिताराम पवार या युवकास तानाजी गणपती घाडगे तालुका खटाव, जिल्हा सातारा येथील व्यक्तीने प्रति महिना तीस हजार रुपये पगार देत सोने-चांदीच्या दुकानात कामाला लावतो म्हणून घेऊन गेला होता. परंतु, मागील दोन दिवसात तानाजी घाडगे यांचा सिद्धनाथ पवार यांचे वडील सिताराम पवार यांना फोन आला की, तुमच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला आहे, हे ऐकताच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला. दरम्यान आपल्या मुलाचा अपघात नसून घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त करीत संबंधित व्यापाऱ्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सिताराम पवार यांनी सांगोला पोलिस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. 

यावेळी सिताराम पवार यांनी निवेदनात म्हटले की, नऊ महिन्यापूर्वी तीस हजार रुपये पगार देतो म्हणून माझ्या मुलाला तानाजी घाडगे याने सोन्या-चांदीच्या दुकानला कामाला घेऊन गेला. गेल्या काही दिवसांपासून मुलाच्या कामाचे पैसे मागण्यासाठी मी वारंवार फोन करून त्यांना संपर्क करत होतो. परंतु माझ्या फोनला तो दाद देत नव्हता. दरम्यान, बुधवार, दि. २० मार्च रोजी तानाजी घाडगे यांनी मला फोन करून तुमच्या मुलाचा अपघात झाला आहे. तुम्ही तत्काळ या असे सांगून मुलगा सिद्धनाथ यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूबाबत मला संशय वाटत असून पैशाच्या कारणावरून व्यापाऱ्यानेच माझ्या मुलाच्या घातपात केल्याचा त्यांनी संशय व्यक्त केला.