सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांचा गुरुवार सांगोला येथे नागरी सत्कार समारंभ पार पडला. छ. शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशीच हा सत्कार आयोजित केल्याने सांगोला शहर आणि तालुक्यातील शिवप्रेमी चांगलेच आक्रमक झाले आहेत. छ. शिवरायांच्या पुतळ्यासमोरच हा कार्यक्रम घेतल्याने शिवप्रेमींनी शहरातील छ शिवाजी महाराज चौकात असलेल्या छ. शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून या नागरी सत्काराचा निषेध व्यक्त केला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे दुखद निधन झाले होते तेंव्हापासून सबंध महाराष्ट्रात ३ एप्रिल हा काळा दिवस म्हणून पाळला जातो.
जयकुमार गोरे हे राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी कधी असते याचे भान नव्हते का असा संतप्त सवाल यावेळी शिवप्रेमींनी उपस्थित केला. यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्व शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी आणि हर हर महादेव अशा घोषणांनी छ. शिवाजी महाराज चौक दणाणून सोडला होता यावेळी बोलताना शिवप्रेमी दत्तात्रय सावंत म्हणाले, राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या कॅबिनेट मंत्र्यांना नेमकं झालंय तरी काय ? एक मंत्री छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीला जयंती म्हणतो आता तर छत्रपती शिवरायांचा पुण्यतिथी दिवशी त्यांच्या पुतळ्या समोरच नागरी सत्काराचा नावाखाली पालकमंत्री आणि त्यांच्या समर्थकांनी जो उन्माद साजरा केला तो नक्कीच शोभनीय नाही. तर अभिषेक कांबळे यांनीही कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे आणि या सत्कार समारंभाच्या संयोजन समितीवर तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.