सांगोला तालुक्यासाठी राजेवाडी तलावातून पाण्याचे आवर्तन केले सुरू 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी पंढरपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सांगोला तालुक्यातील भीषण पाणी टंचाईची परिस्थिती सांगितली. सांगोला तालुक्यातील खवासापूर, लक्ष्मीनगर, चिकमहुद, नराळेवाडी, व वाकी गावांना राजेवाडी तलावातून प्रत्येक वर्षी पाच आवर्तने सोडण्यात येतात. परंतु चालू वर्षी उन्हाळी आवर्तने प्रकरण प्रसिद्ध केले नाही. सदर गावातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ऊस, डाळींब, केळी अशी पिके आहेत.

सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने राजेवाडी तलावातून उन्हाळी आवर्तने प्रसिद्ध करून वरील गावांना पाणी सोडण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. या मागणीची दखल घेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पाण्याचा शब्द पाळला असून सांगोल्यातील नागरी सत्कार स्वीकारण्याआधी सांगोल्यासाठी राजेवाडी तलावातून पाण्याचे आवर्तन सुरू केल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.