इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख शकिल सय्यद यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएम सरकार विरोधात घोषणाबाजी केली. त्यावेळी निदर्शने करत घोषणाही देण्यात आल्या. ईव्हीएम सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या कृषिमंत्री माणिक कोकाट्याचा धिक्कार असो, लाडक्या बहिणीचा अवमान करणाऱ्या मस्तवाल भाजप सरकारचा धिक्कार असो, गॅस दरवाढ रद्द झालीच पाहिजे अशा घोषणांनी तहसील परिसर दणाणून सोडला.
शकिल सय्यद म्हणाले, ईव्हीएम सरकार स्थापन होऊन जवळपास १०० दिवस उलटले परंतु सरकारने निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेली आश्वासने पुर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. महागाई गगनाला भिडली आहे. सरकार ने घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महाग करून लाडक्या बहिणीचा अवमानच केला आहे. कृषिमंत्री बेताल वक्तव्य करत शेतकऱ्यांची थट्टा करत आहेत. मुस्लिम वक्फ बोडांचे बिल पास करुन मुस्लिम वक्फ बोर्डाच्या जमिनी कवडीमोल भावाने अदानीच्या घशात जाणार आहेत. हिंदुत्वाच्या नावाखाली समाजात दरी, द्वेष पसरविण्याचे पाप सरकार करत आहे.
यावेळी तात्यासाहेब बामणे, अशोक चव्हाण, रामराव थोरात, जमीर नालबंद, रशिद डाके, दिपक कळसे, अरुण कुपाडे, इकबाल वायकर, सुरेल अन्सारी, सिकंदर शेख, नितीन धुमाळे, भाऊ माने विकास पिसाळ उपस्थित होते.