इस्लामपूर येथील राजारामबापू कारखान्याच्यावतीने उस उत्पादनवाढीसाठी चर्चासत्राचे आयोजन

इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील सह. साखर कारखाना कार्यस्थळावर राजारामबापू साखर कारखाना, अँग्री कल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्यावतीने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित शेतकरी चर्चासत्रात आ. जयंतराव पाटील बोलत होते कि, ऊसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज आहे. या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास एका बाजूला ३० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादनात वाढ होऊन दुसऱ्या बाजूला पाणी, खतात बचत होते. जमिनीची सुपिकता टिकून राहते. आपला साखर कारखाना आपणास पूर्ण सहकार्य करेल. आपण प्रगतशील शेतकरी म्हणून ऊसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर सुरू करावा.

आ. पाटील म्हणाले, बारामती येथे एआय तंत्रज्ञानाचा ऊस शेतीत वापर करून एकरी उत्पादन वाढते हे सिद्ध झाले आहे. गेल्या ५ वर्षापासून ऑस्कफर्ड युनिव्हर्सिटी, मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सहकार्याने काम सुरु आहे. व्हीएसआय केव्हीकेचा करारानंतर आपला कारखाना करार करेल. कारखान्याच्या ऊस विकास विभागातील अधिकारी-कर्मचारी आपणास मार्गदर्शन करतील.  कारखाना पाठीशी ठामपणे उभा राहील. पुढच्या टप्प्यात १०-१५ हजार शेतकऱ्यांना सहभागी करून घेऊ.

डॉ. अशोक कडलग म्हणाले, सध्या शेती करताना शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने, अडचणी उभा आहेत. ती कमी करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. क्षारपड जमिनीतही एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऊस शेतीत उत्पादन वाढ करू शकतो. कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील यांनी प्रास्ताविक भाषणात कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्या पुढाकाराने कारखाना राबवित असलेल्या नाविन्यपूर्ण आणि शेतकरी हिताच्या योजनांची माहिती दिली.