Anil Kapoor Birthday: टपोरीगिरी, गॅरेजमध्ये काम ते थेट एव्हरग्रीन हीरो अनिल कपूर.. वाचा सविस्तर..

अभिनेता अनिल कपूर यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने पाहूया ही खास स्टोरी..

Anil Kapoor: वयाची साठी गाठूनही एखाद्या तरुण अभिनेत्याला लाजवतील असे तारुण्य आणि फिटनेस म्हणजे अभिनेता अनिल कपूर. अनिल यांचा आज आज  67 वा वाढदिवस आहे. ते  67 वर्षांचे झाले यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. अनिल यांनी आजवर अनेक हिट सिनेमे दिले. आजही ते मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत. आपल्या अभिनयाने त्यांनी आजवर प्रचंड यश आणि संपत्ती कमावली पण ही इतकं सोप्पं नव्हतं. अनिल यांनी स्ट्रगलच्या काळात गॅरेजमध्येही काम केले आहे. जाणून घेऊया कसा होता त्यांचा स्ट्रगल..

अनिल कपूर यांनी सुरुवातीच्या काळात प्रचंड मेहनत घेतली आहे. अगदी पडेल ते काम करून त्यांनी उपजीविका केली आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण बॉलिवूडमध्ये येण्याआधी ते अभिनेते राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये काम करायचे. गॅरेजमध्ये काम करून त्यांनी एक घर भाड्यानं घेतलं. अनेक वर्ष ते भाड्याच्या घरात राहिले. पण काहीतरी करून दाखवायची जिद्द असल्याने ते बॉलीवुड मध्ये आले आणि सुपरस्टार झाले.

अनिल कपूर यांचे बालपणही फारसे सुखावह नव्हते. मी एखाद्या टपोरी मुलासारखाच होतो असे अनिल यांनी स्वतः सांगितले होते. एका मुलाखतीत ते म्हणले होते की, ‘मी सिनेमात टपोरी मुलाची भूमिका फार उत्तमरित्या करू शकतो. कारण मी आधी तसाच होतो. लहानपणी मी मित्रांबरोबर टपोरीगिरी करत फिरायचो. मी सिनेमाची तिकिटं देखील ब्लॅकनं विकली आहेत’.

अनिल कपूर यांना 1980साली ‘वामसा वृक्षम’ या तेलुगू सिनेमातून ब्रेक मिळाला. त्यानंतर 1983साली आलेल्या ‘वो सात दिन’ या सिनेमातून ते बॉलीवुडमध्ये आले. मात्र त्यांना खरी ओळख मिळाली ते शेखर कपूरच्या ‘मिस्टर इंडिया’ या सिनेमातून. या चित्रपटानंतर त्यांचं नशीब पालटलं. मिस्टर इंडिया’मधील भूमिका त्यांना योगायोगानं मिळाली. या सिनेमात आधी अमिताभ बच्चन काम करणार होते पण त्यांनी नकार दिल्याने अनिल कपूर यांच्याकडे हा सिनेमा आला.

त्यानंतर अनिल कपूर यांनी मागे वळून पाहीलं नाही. एकास एक जबरदस्त सिनेमे त्यांच्या वाट्याला आले. त्यांच्या ‘जुदाई’ चित्रपटाने तर प्रेक्षकांना वेड लावलं. तेजाब, रामलखन, बुलंदी, नायक असे कित्येक सिनेमे त्यांनी हिट केले. एवढेच नाही तर आजही ते तितक्याच ताकदीने चित्रपट आणि वेब सिरिजमध्ये काम करत आहेत.