Stock Market Holidays in 2024: डिसेंबर महिन्याच शेअर मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी स्थानिक शेअर बाजारात तेजी होती. BSE सेन्सेक्स २४२ अंकांनी वधारला होता. पण आता ख्रिसमसदिवशी शेअर बाजार बंद असणार की नाही, जाणून घ्या
हायलाइट्स:
- शुक्रवारी शेअर बाजार तेजीसह बंद झाला होता
- डिसेंबर महिन्यात बाजारात आवक वाढली आहे
- २५ डिसेंबरला ख्रिसमसला शेअर बाजार बंद राहणार आहे
नवी दिल्ली : डिसेंबर महिन्यात शेअर मार्केटमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. शेअर मार्केटने नवे विक्रम केले आहेत. सेन्सेक्स-निफ्टी नव्या उच्चांकावर पोहोचले. या आठवड्याच्या अखेरच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे शुक्रवारीही बाजार वाढीसह बंद झाला होता. शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी स्थानिक शेअर बाजारात तेजी होती. BSE सेन्सेक्स २४२ अंकांनी वधारला होता. प्रामुख्याने आयटी शेअर्सची खरेदी आणि अमेरिकन बाजारही मजबूत राहिल्याने बाजारात तेजी होती.
३० शेअर्सवर आधारित सेन्सेक्स २४१.८६ अंकांच्या किंवा ०.३४ टक्क्यांच्या वाढीसह ७१,१०६.९६ अंकांवर बंद झाला. व्यापारादरम्यान तो ३९४.४५ अंकांवर पोहोचला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ९४.३५ अंकांच्या म्हणजेच ०.४४ टक्क्यांच्या वाढीसह २१,३४९.४० वर बंद झाला. नवीन आठवड्याच्या पहिल्या व्यावसायिक दिवशी ख्रिसमस येत आहे. अशा स्थितीत २५ डिसेंबरला बाजारात खरेदी-विक्री होणार की नाताळला सुट्टी असणार याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे.
ख्रिसमसला शेअर मार्केट बंद राहणार का?
बीएसईच्या परिपत्रकानुसार, सोमवारी म्हणजेच २५ डिसेंबर रोजी ख्रिसमससाठी शेअर बाजार बंद राहील. एनएसई आणि बीएसई निर्देशांकांवर इक्विटी, डेरिव्हेटिव्ह आणि एसएलबी सेगमेंटमध्ये कोणतेही व्यापार होणार नाहीत. या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये शेअर मार्केटला १६ दिवस सुट्ट्या होत्या. मात्र, नाताळपूर्वी शेअर बाजारात चांगलीच तेजी पाहायला मिळाली. अशा स्थितीत, मंगळवारी बाजाराची सुरुवात सकारात्मकतेने होईल, अशी आशा तज्ज्ञांना आहे.
२०२४ मध्ये इतके दिवस शेअर मार्केट बंद राहणार
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसईने एक परिपत्रक जारी केले आहे. हे नवीन वर्षाच्या सुट्टीबद्दल आहे. या अंतर्गत कोणत्या दिवशी सुट्टी आहे आणि आठवड्याअखेरीस येणारी सुट्टी देखील दिली आहे. त्यात लाँग वीकेंडचीही माहिती देण्यात आली आहे. परिपत्रकानुसार नवीन वर्षात म्हणजे २०२४ मध्ये एकूण १९ सुट्ट्या आहेत. यापैकी १४ सुट्या कामकाजाच्या दिवशी आहेत. उर्वरित ५ शनिवार किंवा रविवारी एकूण ७ लाँग वीकेंड्स आहेत.