सलमान खान स्पष्टच बोलला, ‘काश्मीर आता स्वर्गाऐवजी…,’ शाहरुख खानही झाला व्यक्त

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खाननेही सोशल मीडियाच्या माध्यमातून यावर भाष्य केलं आहे. शाहरुख खानने जीव गमावणाऱ्यांच्या कुटुंबीयांशी पाठीशी राहण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. तसंच देशवासीयांना ही वेळ एकत्र राहण्याची आहे असं म्हटलं आहे.

शाहरुखने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “पहलगाममध्ये घडलेल्या विश्वासघातकी आणि अमानवीय हिंसाचाराबद्दलचे दुःख आणि राग शब्दांत व्यक्त करता येत नाही. अशावेळी, फक्त देवाचा धावा करु शकतो आणि पीडित कुटुंबांसाठी प्रार्थना करू शकतो आणि माझ्या तीव्र संवेदना व्यक्त करू शकतो. एक राष्ट्र म्हणून आपण एकजूट, मजबूत राहू आणि या घृणास्पद कृत्याविरुद्ध न्याय मिळवू”.

सलमान खाननेही एक्सवर पोस्ट शेअर करत आपला राग व्यक्त केला आहे. त्याने लिहिलं आहे की, “पृथ्वीवरील स्वर्ग (paradise) असणारा काश्मीर नरकात बदलत आहे. निष्पाप लोकांना लक्ष्य केलं जात आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती मनात वेदना आहेत. एका निष्पाप व्यक्तीची हत्या करणे हे संपूर्ण देशाला मारण्यासारखे आहे”.

प्रियांका चोप्रानेही तिच्या इंस्टाग्रामवर संताप व्यक्त करणारा मेसेज लिहिला आणि या दहशतवादी कृत्याचा निषेध केला. तिने लिहिलं आहे की, “पहलगाममध्ये जे घडले ते निंदनीय आहे. लोक तिथे सुट्टीसाठी, हनिमूनसाठी, त्यांच्या कुटुंबियांसोबत आनंद साजरा करण्यासाठी होते. फक्त काश्मीरसारख्या स्वर्ग (paradise) असलेल्या सौंदर्याचा आनंद घेत होते. ही अशी दुर्घटना नाही जी आपण सहजासहजी विसरु शकतो. अनेक निष्पाप जीव अशा वादळात अडकले ज्याची त्यांनी कधीही अपेक्षा केली नव्हती. त्यांच्या प्रियजनांसमोरच त्यांना लक्ष्य करण्यात आले. मला खूप वाईट वाटत आहे”.

पाकिस्तानस्थित बंदी घातलेल्या दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबाचा (एलईटी) एक भाग असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने (टीआरएफ) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.


हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी परिसराला वेढा घातला आहे. जखमींना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले. स्थानिकांनी जखमींना घोड्यांवर बसवून खडकाळ प्रदेशातून पहलगाम येथे नेण्यास मदत केली.