आयटीआर (ITR) दाखल करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर आहे. यावेळी सरकारने इन्कम टॅक्स फॉर्म आणि ऑनलाईन पद्धतीत काही सुधारणा केल्यामुळे 31 जुलैवरून ही अंतिम तारीख 15 सप्टेंबर करण्यात आली होती पण तुम्हाला माहिती आहे का की आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख सर्वांसाठी सारखी नाही आहे?
उदाहरणार्थ तुम्ही व्यक्ती किंवा हिंदू अविभाजित कुटुंब म्हणजे HUF असाल आणि तुमच्या खात्याचे ऑडिट आवश्यक नसेल, तर तुमच्यासाठी आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025 आहे. सरकारने मूल्यांकन वर्ष 2025-26 साठी ही तारीख वाढवली आहे. त्याचवेळी, ज्या करदात्यांच्या खात्यांचे ऑडिट अनिवार्य आहे, त्यांच्यासाठी आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2025 आहे. यामध्ये कंपन्या, प्रोप्रायटरशिप फर्म किंवा फर्मचे कार्यरत भागीदार समाविष्ट आहेत पण या करदात्यांना त्यांचा ऑडिट अहवाल 30 सप्टेंबर 2025 पर्यंत सादर करावा लागेल.
आंतरराष्ट्रीय व्यवहार करणाऱ्या करदात्यांना आयकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 असून या श्रेणीत येणाऱ्या करदात्यांना कलम 92E अंतर्गत अहवाल सादर करावा लागतो आणि ऑडिट अहवाल 31 ऑक्टोबरपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. व्यवसाय किंवा उत्पन्न आंतरराष्ट्रीय व्यवहारांशी संबंधित असलेल्या करदात्यांना हा नियम लागू होतो.
तसेच, तुम्ही आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख चुकवली आणि तरीही रिटर्न दाखल करायचे असेल तर उशिरा म्हणजे विलंबित आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर असेल. म्हणजे, तुम्ही कोणत्याही श्रेणीतील करदाते असाल आणि वेळेवर रिटर्न दाखल करू शकला नसाल, तर तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत उशिरा रिटर्न दाखल करू शकता.
