रक्ताचे वारस आणि कार्याचे वारस यांच्यातील वैचारिक संघर्षातून व न्यायालयीत प्रक्रियेतून बहुचर्चित ठरलेल्या देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेस मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याचे आदेश सायंकाळी प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. या आदेशाने पी. एम. पाटील व रजनीताई मगदूम गटात कही खुशी कही गम असे वातावरण आहे. २९ एप्रिल पासून निवडणूकीच्या पुनर्प्रक्रियेस सुरुवात होणार होती, तत्पुर्वीच स्थगिती आल्याने पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत दोघांनाही वाट पहावी लागणार आहे. तीन महिन्यापुर्वी पंचगंगा साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली होती. दरम्यान रजनीताई मगदूम, अशोक पाटील, अण्णासाहेब शहापूरे यांच्यासह त्यांच्या गटाचे उमेदवारांचे अर्ज सुचक अनुमोदक यांचा ऊस आलेला नाही. जनरल सभेला अनुपस्थिती आदी कारण दाखवत हे अर्ज बाद ठरवले होते. यामुळे आण्णांच्या कन्या रजनीताई मगदूम यांनी केंद्रीय सहकार कायद्यात अशी तरतुद नसल्याचे कारण देत केंद्रीय सहकार निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती. या तक्रारीची गांभिर्याने दखल घेऊन तीन महिन्यापूर्वी झालेली निवडणूक बेकायदेशीर ठरवत संचालक मंडळ बरखास्त करून नव्याने निवडणूक घेण्याचे आदेश केंद्रीय सहकार खात्याने दिले होते. त्यानुसार नविन निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यामुळे पी.एम. पाटील गटाला मोठा धक्का बसला होता.
नव्याने निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्याने निवडणुकीस सामोरे जात रजनीताई मगदूम आणि पी.एम. पाटील यांनी सभासदांच्या भेटीगाठी घेऊन प्रचारास सुरवात केली होती. दरम्यात केंद्रीय सहकार खात्याच्या आदेशाच्या विरोधात पी. एम. गटाने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. यावर आज सुनावणी होऊन २३ एप्रिल २०२५ च्या आदेशात दिलेल्या कारणांनुसार, असे निदर्शनास आणून देण्यात येते की वादग्रस्त आदेशानुसार निवडणूक २९ एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे परंतु बिनविरोध निवडणूक आधीच झाली असल्याने, ३ एप्रिल २०२५ च्या वादग्रस्त आदेशाच्या कलम ९ अंतर्गत सुरू करण्याचे निर्देशित सुधारित निवडणूक कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत स्थगित राहील असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे दोन्ही गटांना पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
+