खानापूर तालुक्यातील बेनापुर गावचा सुपुत्र असलेल्या विवेक कृष्णराव शिंदे यांने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशभरातून ९३ व्या रँकसह आयपीएस पदाला गवसणी घातली आहे. विवेक शिंदे यांनी प्राथमिक शिक्षण घेतलेल्या विट्यातील भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूलच्यावतीने आज त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल विटाच्या प्राचार्या शीला दिवटे, सावित्री जाधव, ना आलायस थॉमस, उदय कांबळे, संग्रामसिंह पाटील, दी भारती लाड यांच्या हस्ते विवेक शिंदे यांचा सत्कार 5, करण्यात आला.
यावेळी बोलताना विवेक शिंदे म्हणाले, स्पर्धा परिक्षेसह कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असल्यास व्यक्तीमत्त्वाचा विकास चांगल्या प्रकारे होणे गरजेचे असते. भारती विद्यापीठाचे इंग्लिश मीडियम स्कूलमधून दर्जेदार शिक्षणाबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक, वक्तृत्व, गीत गायन या सर्वच माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अष्टपैलू व्यक्तीमत्त्वाचा विकास करण्याचा प्रयत्न केला जातो. स्पर्धा परिक्षांमध्ये अभ्यासाबरोबरच व्यक्तिमत्वाचा विकास होणे हे अत्यावश्यक असते. शिंदे म्हणाले, भारती विद्यापीठामध्ये प्राथमिक शिक्षण घेत असताना शिक्षणाबरोबरच शिक्षकाने केलेले संस्कार पुढील आयुष्यासाठी खूप मोठी शिदोरी ठरले. विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेनंतर आपण कोणत्या क्षेत्रात करिअर केले पाहिजे, याबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षा असो किंवा क्रीडा क्षेत्र असो त्या क्षेत्रात नियोजनबद्ध आणि पूर्ण क्षमता, जिद्द, चिकाटीने काम केल्यास आपल्याला यश निश्चित मिळत असते, असे मत विवेक शिंदे यांनी व्यक्त केले.