शहरातील कचरा उठावाचेकाम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची ३ वर्षाची प्रॉव्हीडंड फंडाची रक्कम महापालिकेने मक्तेदाराच्या बिलातून वजा करुन संबंधित विभागाकडे भरावी, १३ हजार ५०० अधिक २ दिवसांचा सुट्टीचा पगार असा महिन्याला पगार द्यावा आणि इएसआय कार्ड २ दिवसात कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय खासदार धैर्यशील माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. इचलकरंजी शहरातील कचरा उठाव करणाऱ्या घंटागाडीवरील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी प्रॉव्हीडंड फंड, सुट्टीचा पगार आणि इएसआय कार्ड यासह विविध मागण्यांसाठी वारंवार आंदोलन करूनही मक्तेदाराकडून त्याची पुर्तता होत नव्हती. यावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना पक्षाने खासदार धैर्यशील माने यांच्याकडे धाव घेतली होती. त्यानुसार शुक्रवारी खास. माने यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना कार्यालयात बैठक झाली.
यावेळी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून आदर्श फॅसिलिटी कंपनीच्या मक्तेदाराने कंत्राटी कर्मचाऱ्यांची ३ वर्षे प्रॉव्हीडंड फंडाची रक्कम भरली नसेल तर महापालिकेने मक्तेदाराच्या बिलातून व बयाणा रक्कमेतून ती रक्कम वजा करुन संबंधित विभागाकडे भरावी, अन्यथा संबधित कंपनीवर महापालिकेने फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच सध्याच्या कंपनीने कर्मचाऱ्यांना महिन्याला १३ हजार ५०० अधिक २ दिवसांचा सुट्टीचा पगार असा महिन्याला पगार द्यावा आणि इएसआय कार्ड २ दिवसात देण्याचा निर्णय घेण्यात आला.
