इचलकरंजी येथील शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी आपटे वाचन मंदिर (Apte Vachan Mandir) यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही २ ते ९ मे या कालावधीत वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. डीकेटीई राजवाडाच्या पटांगणात दररोज सायंकाळी ७ वाजता ही व्याख्यानमाला होत असून यानिमित्ताने विविध विषयांची इचलकरंजीकरांना मेजवानी लाभणार आहे, अशी माहिती आपटे वाचन मंदिराच्या अध्यक्षा सुषमा दातार यांनी दिली.त्या म्हणाल्या, यानिमित्ताने विविध क्षेत्रातील व्याख्यात्यांच्या विविध विषयांवरील माहिती जाणून घेण्याची संधी उपलब्ध होत आहे.
२ मे रोजी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचा शुभारभ होत असून पहिल्याच दिवशी त्यांची प्रकट मुलाखत होणार आहे. शनिवार ३ मे रोजी डॉ. गिरीश कुलकर्णी (अहिल्यानगर) यांचे आशयसंपन्न जगण्याची प्रकाशवाट या विषयावर व्याख्यान होईल. रविवार ४ मे रोजी मनसमझावन कार आणि प्रधान आयकर आयुक्त संग्राम गायकवाड (पुणे) यांच्याशी मुक्त संवाद होणार आहे. सोमवार ५ मे रोजी सम्राट फडणीस (पुणे) यांचे माध्यमे व समाज या विषयावर, मंगळवार ६ मे रोजी सीए मिलिंद काळे (पुणे) यांचे सहकार समृध्दीचे आधुनिक सुत्र या विषयावर व्याख्यान होणार आहे. बुधवार ७ मे रोजी ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या साहित्यातील प्रितीच्या छटा उलगडणारा अस्पर्शित प्रीतीचा शोध हा कार्यक्रम होईल. याची संकल्पना आणि विवेचन डॉ. निर्मोही फडके (ठाणे) यांचे असून दिग्दर्शन योगेश केळकर यांचे आहे. तर वंदना प्रविण गुजरे व योगेश केळेकर अभिवाचन करतील. गुरुवार ८ मे रोजी अंजली चिपलकट्टी (पुणे) यांचे माणूस असा कसा वागतो ? विषयावर आणि शुक्रवार ९ मे रोजी चिन्मयी सुमीत यांचे संवाद संवेदशनील अभिनेत्री व्याख्यान होईल. रसिक प्रेक्षकांनी या व्याख्यानमालेचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आपटेवाचन मंदिराच्या (Apte Vachan Mandir) वतीने करण्यात आले आहे.