माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) कणकवलीत गो शाळा उभारणार आहेत. यामुळे गोसंवर्धन होण्यासोबतच स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याची माहीती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 11 मे रोजी गोवर्धन गो शाळा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या तुलनेत एक वेगळी गो शाळा जिल्ह्यात होणार असल्याची माहिती नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत दिली.
गोशाळेतून रोजगार
हिंदू धर्मात गाय पवित्र मानले जाते. गाय म्हणजे समृद्धी. जिल्ह्यातील लोकांनी गाय पाळावी म्हणजे समृद्धीचा मार्ग येईल. म्हणून मी हा प्रयत्न करत असल्याचे नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले. गो शाळेत गाईच्या अनेक जाती असणार आहेत. जिल्ह्यातील लोकांनी दुधाचा व्यवसाय करण्याचे आवाहन राणेंनी यावेळी केले. कणकवीलीती करंजे गावात भव्य गोशाळा उभारली जाणार आहे. येथे दूध संकलनाची व्यवस्था केली जाणार असून 5 रुपये किलोने शेण घेतले जाणार आहे. तसेच गोमूत्रदेखील घेतलं जाणार आहे. खताची फॅक्टरीदेखील सुरु केली जाणार आहे. जिल्ह्यात शेणापासून रंग बनविण्याची फॅक्टरी तयार केली जाणार आहे. शेळी मेंढी प्रकल्पदेखील त्याच ठिकाणी असेल अशी माहिती राणेंनी यावेळी दिली.