राज्य सरकारबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून वस्त्रोद्योगाला आणखीन गतीने पुढे नेण्यासाठी शक्य ती मदत करु, अशी ग्वाही केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी दिली. तसेच देशभरातील वस्त्रोद्योगातून सध्या १७५ बिलियन डॉलर्सची उलाढाल होत आहे. ही उलाढाल ३५० बिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचा संकल्प केंद्रातील मोदी सरकारने केला आहे. पण हा संकल्प वस्त्रनगरी इचलकरंजीतील उद्योजकांशिवाय शक्य नाही, असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह हे सोमवारी इचलकरंजी दौऱ्यावर आले होते. त्यांच्यासोबत बिहारचे आमदार सर्वेश यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी संपूर्ण दिवसभरात वस्त्रोद्योगातील विविध घटकांना प्रत्यक्ष भेटी देत सखोल माहिती जाणून घेतली. त्यानंतर सायंकाळी इचलकरंजी पॉवरलूम असोशिएशनच्या सभागृहात त्यांनी उद्योजक, व्यापारी व कारखानदार यांच्याशी संवाद साधला.
तत्पूर्वी पॉवरलूम असोशिएशनच्या प्रांगणात इचलकरंजी शहरातील विविध उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांची त्यांनी पाहणी करत माहिती घेतली. नाम. सिंह पुढे म्हणाले, राज्य शासनाच्या माध्यमातून वस्त्रोद्योगाला विविध सवलती दिल्या जात आहेत. मात्र, केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात येणारी टफ योजना २०२२ साली बंद झाली आहे. ती पूर्ववत कशी सुरु होईल यासाठी मी प्रयत्न करेन. जीएसटी, ४५ दिवसांची पेमेंटधारा आणि अन्य मुलभूत मागण्यांचा निश्चितपणे केला जाईल. इचलकरंजी शहराला लॉजिस्टिक पार्कची गरज असून त्या संदर्भातही लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचा माझा प्रयत्न राहिल. वीज बिलातून मुक्तता मिळण्यासाठी मोदी सरकारने अपारंपारीक ऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्याचाही फायदा इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाला कसा होईल यासाठी पाठपुरावा करेन, अशी ग्वाही दिली.
प्रारंभी इचलकरंजी पॉवरलूम असोशिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, राज्यातील वस्त्रोद्योगाला आणखी उर्जितावस्था देण्यासाठी प्रयत्न सुरू असून वीज बिलातून सुटका होण्यासाठी सोलर एनर्जीचे नवीन धोरण आणत असल्याचे सांगितले. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी, इचलकरंजी शहरातील साध्या यंत्रमागधारकांच्या समस्या प्रामुख्याने मंत्रीमहोदयांसमोर मांडल्या. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी, वीज बिलाच्या कचाट्यातून बाहेर काढून वस्त्रोद्योगाला उभारी देण्यासाठी सौरऊर्जा योजनेला भरीव सहकार्य करण्यासाठी राज्यातील फडणवीस सरकारला सुचित करावे. त्याचबरोबर केंद्र शासनाकडून दिली जाणारी टफ योजना पूर्ण क्षमतेने पुनश्च सुरु करण्यात यावी, अशा मागण्या केल्या.
खासदार धैर्यशील माने यांनी, वस्त्रोद्योगाचा इतिहास सांगत इचलकरंजी शहराला आणखीन गतीने पुढे नेण्यासाठी केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाकडून भरीव सहकार्याची मागणी केली. आमदार राहुल आवाडे यांनी, इचलकरंजी शहराच्या वस्त्रोद्योगाला नवीन दिशा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने मदत करावी. अशी मागणी केली. खासदार धनंजय महाडीक यांनी, उद्योजकांना बळ देण्यासाठी सरकारने निश्चित धोरण आखावे, असे सांगितले. यावेळी मंत्री गिरीराज सिंह यांना विविध संस्था, संघटनांनी मागण्यांचे निवेदने सादर केली. यावेळी इचलकरंजीत उत्पादीत होणाऱ्या कापडाची निर्यात ‘ओम ब्रॅण्ड’ या नांवाने होण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लोगो चे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.